Thursday, 29 June 2017

*!! भारतीय क्रिकेट आणि होळकर राजघरण !!*

*!! भारतीय क्रिकेट आणि होळकर राजघरण !!*

अवधूत लाळगे

🏏 क्रिकेट मधील रणजी ट्रॉफी 🏆 ही भारतात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेतील सर्वात मोठी आणि मानाची स्पर्धा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळा कडून सन १९३४-१९३५ साली *"भारतीय क्रिकेट चॅम्पियनशिप"* स्पर्धा भरवण्यात आली. सदरच्या स्पर्धेची ट्रॉफी 🏆 पटियाला चे *"महाराज भुपिंदरसिंग"* यांनी दान केली. नंतर हीच स्पर्धा रणजी ट्रॉफी म्हणून खेळवली गेली. या स्पर्धेला रणजी ट्रॉफी हे नाव पडण्या मागे कारण म्हणजे *"रंणजितसिंग"* नामक क्रिकेटर. रंणजितसिंग हे नवानगर चे राजे म्हणजे इंग्रजांच्या प्रिन्सली स्टेट चेच एक भाग. त्यांचा कार्यकाळ १९०७ ते १९३३. त्यांनी त्या काळात इंग्लिश क्रिकेट टीम कडून खेळन्याचा पहिला भारतीय म्हणून मान मिळवला. तसेच नंतर ते कॅब्रिज युनिव्हर्सिटी कडून खेळले. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ भारतातील क्रिकेट ट्रॉफी ला नंतर *रणजी ट्रॉफी* हे नाव देण्यात आले. पहिली रणजी ट्रॉफी ही मुंबई ने जिंकली असून अश्याच एकूण ४० ट्रॉफ्या आतापर्यंत जिंकल्या आहेत. सदरच्या स्पर्धत इंग्रजांची प्रिन्सली स्टेट असलेली *होळकर टीम* पण भाग घेत होती. या स्पर्धेत सन १९४४ ते १९५५ या काळात "होळकर टीम" चा धबधबा राहिला आहे. ही होळकर टीम *"महाराजाधिराज राजराजेश्वर सवाई श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर (द्वितीय)"* हे चालवत होते. या कालावधीत बरेच विजेता आणि उपविजेता ही होळकर क्रिकेट टीमचं राहिली आहे. होळकर टीम कडून सी.के.नायडू आणि मुश्ताक अली सारखे नवाज लेले खेळाडू खेळले आहेत. होळकरांच स्वतःच होळकर स्टेडियम हे इंदोरला आहे. याच *होळकर स्टेडियम* वर सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट चे सामने भरवले जातात. एखाद्या राजघराण्याच्या नावाने असलेलं क्रिकेट च *"होळकर स्टेडियम"* हे भारतातील एकमेव क्रिकेट स्टेडियम आहे.

*होळकरांनी रणजी ट्रॉफी विजेता आणि उपविजेता राहिलेली साल पुढील प्रमाणे :-*

१९४४-४५ :- उपविजेता
१९४५-४६ :- विजेता
१९४६-४७ :- उपविजेता
१९४७-४८ :- विजेता
१९४९-५० :- उपविजेता
१९५०-५१ :- विजेता
१९५१-५२ :- उपविजेता
१९५२-५३ :- विजेता
१९५३-५४ :- उपविजेता
१९५४-५५ :- विजेता

अश्या प्रकारे होळकरांचा भारतीय क्रिकेट वर सलग १० वर्षे दरारा होता यात एकूण ४ वेळा विजेता तर ६ वेळा उपविजेते पद पटकावून *होळकर राजघरण हे भारतीय क्रिकेट इतिहासात अजरामर झालेलं आहे.* कालांतराने मध्यप्रदेश राज्याची स्थापना झाल्यावर होळकर स्टेडियम आणि होळकर टीम ही मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशन मध्ये विसर्जित करण्यात आली.

*🇮🇩⚔!! जय मल्हार !!⚔🇮🇩*

संदर्भ :- १) A History Of Indian Cricket By Mihir Bose
२) इंटरनेट Source

माहिती साभार :- *विठ्ठल खोत*
संकलन शब्दांकन :- *अवधूत लाळगे*

Monday, 20 March 2017

*भारतीय जवान चंदू चव्हाण यांची मुलाखत*

*भारतीय जवान चंदू चव्हाण यांची मुलाखत*
सकाळ वर्तमानपत्र

वयाची बावीशी म्हणजे खरंतर सरत चाललेलं कॉलेजपण अजूनही मनात फेर धरणारं वय. या वयात अनुभव असावेत ते उमलू पाहणारं आयुष्य समृद्ध करणारे. स्वप्नं असावीत ती टोलेजंग भविष्याबद्दल. अशा वयात जीवन-मरणाची लढाई क्षणोक्षणी करावी लागली तर...? एखाद-दुसरा दिवस नव्हे, तब्बल चार महिने प्रत्येक सेकंदाला मृत्यूचं भय अवती भवती असेल तर...? अंधारात सरपटत, भिंतींशी बोलत दिवस काढावे लागले तर...? कोण भोगेल हा छळ...? उत्तर आहे, भारतीय जवान चंदू चव्हाण. पाकिस्तानातल्या कोठड्यांमध्ये 29 सप्टेंबर 2016 पासून तब्बल चार महिने अनन्वित यातना सोसणाऱया चव्हाणांची अखेर जानेवारीत सुटका झाली. पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईकनंतर देश जल्लोष करीत असताना चव्हाण पाकच्या ताब्यात सापडले होते. त्यांच्या सुटकेसाठी भारत-पाकच्या अधिकाऱयांमध्ये चर्चेच्या फेऱया झडल्या...देशवासीयांनी प्रार्थना केल्या. गेल्या आठवड्यात चव्हाण त्यांच्या गावी, धुळे जिल्ह्यातल्या इवल्याश्या बोरविहीर गावात परतले. eSakal.com ने जगभरातील मराठी वाचकांच्यावतीने त्यांच्या घरी त्यांच्याशी संवाद साधला. 

चव्हाण 2012 मध्ये सैन्यात भरती झाले. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी राष्ट्रीय रायफल्स जॉईन केले. सध्या ते 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहेत. आई-वडीलांचे छत्र लहानपणीच हरवलेले. एक भाऊ व एक बहिण. भाऊ भूषण चव्हाण हे सुद्धा लष्करात आहेत. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या तिघा भावडांचे आजी-आजोबांनी (आईचे आई-वडील) पालन पोषण केले. शालेय शिक्षण घेत असताना परिस्थितीमुळे चहाच्या हॉटेलमधील कामापासून ते हमालीपर्यंतचे काम चव्हाण यांनी केले. पराकोटीच्या हालअपेष्टांनी कष्ट, दुःख सहन करण्याची ताकद दिली. आलेल्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. 'या अनुभवाचा सर्वांचा फायदा त्यांना पाकिस्तानच्या ताब्यात असताना नक्कीच झाला,' असे चंदू सांगतात.

अमावस्येची रात्र...
सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवरील ताण अभूतपूर्व वाढला असताना गस्तीची कामगिरी त्यांच्या पथकाकडे होती. 29 सप्टेंबर 2016 ची ती अमावस्येची रात्र. सर्वत्र अंधाराचे राज्य. सीमेवर गस्त घालत असताना चव्हाण नकळत पाकच्या हद्दीत पोहोचले होते. काळोख्या रात्रीला सोबत होती घनदाट जंगलाची. दूरवर पाकिस्तानी सैन्याचा बंदोबस्त दिसत होता. रस्ता चुकल्याचं लक्षात येताच चव्हाणांनी भारतीय हद्दीकडे जाण्यासाठी चालायला सुरूवात केली आणि पाहता पाहता ते जगंलामध्ये भरकटले गेले. साधारण पाच किलोमीटरपर्यंत तरी हे भरकटणे सुरू राहिले. पुढच्या काही मिनिटांत त्यांना पाकिस्तानच्या सैनिकांचा घेराओ पडला. चव्हाणांच्या हातातली बंदूक काढून घेतली गेली. संपूर्ण तपासणी सुरू झाली. पाकिस्तानने पकडल्याचे लक्षात येताच चव्हाण एकदम शांत झाले. स्वस्थ उभे राहिले. इकडे एका पाक सैनिकाने चव्हाणांना गोळ्या घालण्यासाठी बंदूक ताणली. तेवढ्यात दुसऱयानं गोळी न घालण्याचा इशारा केला. 'काही क्षणांचाच वेळ. मग माझे कपडे काढून घेतले गेले. सैनिकांनी कुठूनतरी आणलेला पठाणी ड्रेस मला घालायला लावला. माझ्या चेहऱयावर बुरखा चढवला गेला...आणि वाटचाल सुरू झाली अंधाऱया प्रदेशाकडं...', चव्हाण सांगतात.

कोठडीत मारहाण...
पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतल्यानंतर चव्हाणांना एका कोठडीत डांबून घातले. कोठडीत सतत भीषण मारहाण होत होती. अत्याचाराचा कोणताही प्रकार राहिला नव्हता. 'क्षणाक्षणाला मरण समोर दिसत होते. मारहाण होत असतानाही छाती पुढे करून त्यांना सामोरे जात होतो. मारहाण करून कंटाळल्यानंतर पाकिस्तानी सैनिक कोठडीच्या बाहेर जात. मी अंधाऱया कोठडीमध्ये मेल्यासारखं पडून रहायचो. दिवस-रात्र काही कळत नव्हते. सगळीकडं फक्त अंधारच असायचा. माझ्याकडून भारतीय सैन्याबद्दलची माहिती काढून घेण्यासाठी ही मारहाण चालायची. भारताबद्दल, भारतीय नेत्यांबद्दल शिविगाळ चालायची. नको-नको ते बोलावं, यासाठी मारहाण व्हायची. अश्लिल व्हिडिओसुद्धा बनवत. आपल्या लष्करी शिस्तीनुसार मी तोंड बंद ठेवले,' चव्हाण यांचा हा अनुभव एेकताना अंगावर काटा येतो.

इंजेक्शन्स आणि कांबळ
एकदा मारहाण करताना पाकिस्तानी सैनिकांनी, चौकशी अधिकाऱयांनी चव्हाणांना त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती विचारली. चव्हाणांनी जी काही माहिती दिली, त्याच्या बरोबर उलट माहिती पाकिस्तानी वर्तमानपत्रांत नेमकी दुसऱयाच दिवशी प्रसिद्ध झाली. अधिकाऱयांना समजलं, की चव्हाणांचा भाऊही भारतीय लष्करात आहे. खवळून त्यांनी दुसऱया दिवशी बेदम मारहाण सुरू केली. 'मारहाणीमुळं शरीर सुजलं होतं. नंतर नंतर मारहाण होत असताना समजतही नव्हतं. मारहाण करायची आणि नंतर इंजेक्शनं द्यायची, असं सुरू होतं. बेशुद्धावस्थेत वेदनाही नव्हत्या. शुद्धीवर आल्यानंतर कधीतरी रोटी आणि पाणी मिळे. काय खातो आहे, हे समजायचं नाही. झोपायला कांबळ मिळाली होती. मारहाणीमुळं अंधार, थंडी, कोठडीमधले चावणारे किडे याकडं कित्येक तास लक्ष जायचं नाही...,' चव्हाण सांगतात.

फक्त आणि फक्त देश प्रेमच...
'पाकिस्तानचे सैनिक कोठडीत मला मारून अक्षरशः कंटाळायचे. छाती पुढं करून त्यांना सामोरे गेलो. मारहाण होत असतानाही भारत माता की जय...हेच शब्द बाहेर पडत होते. जन गण मन म्हणायचो. यामुळं सैनिक अधिकच चवताळून उठायचे. काही दिवसांनी मारहाणीनंतर डोळ्यातून पाणी यायचं थांबलं. मी बेशुद्ध होऊ लागलो, की ते सैनिक कोठडीबाहेर पडायचे. शुद्धीवर आल्यानंतर मला माझे सुजलेले हात-पाय दिसायचे. इंजेक्शन दिल्यानंतर परत ग्लानी यायची...' चव्हाण पाठी-पोटावरच्या खुणा दाखवतात. जिथं तिथं सुया टोचलेल्या, मारहाणीमुळं उठलेले वळ आणि फोड आलेले.

भिंतींशी बोलायचो, देवाचे नाव घ्यायचो...
'मारहाणीनंतर शुद्धीवर आल्यानंतर अंधाऱया कोठडीत काही समजत नव्हते. दिवस की रात्र...आठवडा की महिना झाला, काही-काही कळत नव्हते. बोलायला कोणी नव्हतं. कधी-कधी या छळापेक्षा देवानं आपल्याला मरण द्यावं, असे वाटायचं. एक-एक क्षण कित्येक वर्षांसारखा वाटायचा. देवाला विनवणी केली, देवा मला पुर्नजन्म नको,' चव्हाण प्रांजळपणानं सांगतात. 'मग मी भिंतींशीच बोलायचं ठरवलं. अंधारात बसून भिंतींशी बोलायचे. देवाचे नाव घ्यायचो. लहानपणापासूनचे दिवस आठवायचो...गावातल्या अनेकांचा चेहरा डोळ्यापुढं दिसायचा. भिंतीशी बोलत असताना देव आपल्याशी बोलत असल्याचा भास व्हायचा...एकटेपणाला कंटाळून एकदा भगवतगिता द्यायची विनंती पाकिस्तानच्या सैनिकांनी केली. या मागणीमुळं संतापलेल्या सैनिकांनी नंतर थकेपर्यंत मारहाण तेवढी केली...,' चव्हाणांचा एकेक अनुभव पिळवटून टाकणारा.

'तुझा पगार किती?'
'पाकिस्तानचे सैनिक, चौकशी अधिकारी मारहाण करताना प्रश्नांचा भडिमार करत. परंतु, काहीच माहित नसल्याचे सांगायचो. काही विचारले की अहिराणी भाषेतून त्यांना उत्तरं द्यायचो. त्यामुळे त्यांना काही कळायचेच नाही. भोळा चेहरा आणि अहिराणी भाषेमुळं हे येड कोणत्यातरी खेडेगावातून सैन्यात भरती झालेले दिसतयं..याला काहीच माहिती नाही, अशी कदाचित पाकिस्तानी अधिकाऱयांची खात्री पटली होती. त्यांच्यात याबद्दल झालेली चर्चा मला ऐकायलाही मिळाली होती. सुटकेच्या आधी तर तेही मला मारून कंटाळले होते. पाकिस्तानमधून माझी सुटका होणार की नाही याबद्दल मला शेवटपर्यंत माहिती नव्हती. परंतु, कदाचित सैनिकांना समजलं असावं. यामुळंच की काय, ते मला पगार किती मिळतो, सुविधा काय असतात, अशीही माहिती विचारायला लागले होते. अहिराणीत बोलत राहिलो की ते वैतागायचे,' असं चव्हाण आठवून आठवून सांगतात.

देवाकडे एकच मागणे...
'सरकारनं केलेले प्रयत्न आणि देशवासीयांनी केलेल्या प्रार्थना यामुळंच माझी पाकिस्तानच्या नरकयातनांमधून सुटका झाली. अशक्य ते शक्य झालं. देवावर माझी श्रद्धा आहे. यामुळे देवाला माझं एकच मागणे आहे की, देवा माझी जशी पाकिस्तानमधून सुटका केली तशी तेथे बंदि असलेल्या प्रत्येक भारतीयाची सुटका व्हावी...मला माहित आहे, देव माझं गाऱहाणं ऐकून इतरांचीही नक्कीच सुटका करेल..,' चव्हाण गहिवरून बोलत असतात.

भारतात आल्यानंतरच सुर्य पाहिला....
29 सप्टेंबर 2016 नंतर थेट 21 जानेवारी 2017 चा सूर्य चव्हाणांना पाहायला मिळाला. तोपर्यंत त्यांचा केवळ अंधाराशीच सामना होता. एका कोठडीमधून दुसरीकडे घेऊन जाताना पाकिस्तानी सैनिक चव्हाणांवर काळा बुरखा चढवत. त्यामुळं प्रकाशाचा संबंध कधी आलाच नाही आणि कोठून कोठे नेत आहेत, हे सुद्धा समजले नाही. 'कधी सुटका होईल, याची पुसटशीही कल्पना नव्हती. गुंगीच्या इंजेक्शनामुळे वाघा सीमेवरून भारतात कधी परत आलो, हेदेखील समजले नाही. अमृतसरच्या रुग्णालयात उपचार सुरू झाल्यावरच समजले की भारतात परतलोय...मग खूप आनंद झाला...,' सुटकेचा क्षण स्मृतीतून निसटलेले चव्हाण सांगतात.

आज आजी हवी होती....
रुग्णालयातील उपचारानंतर भाऊ भूषण व आजोबांना आधी चव्हाण भेटले. दोघांना पाहून बांध फुटून मिठी मारून रडले. 'मिठी कितीतरी वेळ सोडवतच नव्हती. सतत रडत होतो. बोलायला सुरवात केल्यानंतर आधी आजीची आठवण आली. आजी न आल्यामुळे फोन लावून द्यायला भावाला सांगितलं. पाकिस्ताननं मला पकडल्याच्या धक्यानं तिचं निधन झाल्याचं आजोबांनी सांगितले अन् डोंगरच कोसळला. लहानपणापासून ज्या आजीनं मला लहानाचं मोठं केलं, माझे लाड पुरवले, ती आजी आज मला पाहायला नाही. आजी आज असती तर तिला किती म्हणून आनंद झाला असता. काय खायला देऊ अन् नको असं तिला झालं असतं. घरात वावरत असताना मला आजही ती दिसते. घरी एवढे नातेवाईक आल्याचं पाहून तिला खूप आनंद झाला असता. आजीनं आई-वडिलांची उणिव कधी भासू दिलीच नाही...क्षणाक्षणाला तिची आठवण येते,' डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा चव्हाणांचं आजीवरचं प्रेम सांगून जातात.

देशवासीयांना धन्यवाद !
'पाकिस्तानच्या नरकयातनामधून माझी सुटका व्हावी यासाठी कोट्यावधी देशवासियांनी प्रार्थना केली होती. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे सतत पाठपुरावा करत होते. माझ्या कुटुंबियांना दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवला. भाऊ भूषण चव्हाण व अनेकांच्या आशिर्वाद कामी आले. प्रसारमाध्यमांनीही शेवटपर्यंत विषय लावून धरला होता. भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही मायदेशी आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात होते. मला ही माहिती सुटकेनंतर समजली...माझ्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱया प्रत्येकाचे आभार मानतो,' असं चव्हाण सांगतात.

भारतीय जवान चंदू चव्हाण