Thursday, 12 July 2018

पंढरपूर

पंढरपूर

#पंढरपूर : मराठी संस्कृती घडविणाऱ्या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र. येथील विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. महाराष्ट्रातील तसेच आंध्र-कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातील भागवत धर्म वा संप्रदाय म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वारकरी संप्रदायाचे उपात्य दैवत विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ अशा अन्य नावांनीही ते प्रसिद्ध आहे.

           आषाढी आणि कार्तिकी शुद्ध एकादशींना तेथे सर्व वारकरी, तसेच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटकांतून लाखो अन्य भाविक विठोबाच्या दर्शनासाठी येतात. शुद्ध माघी व शुद्ध चैत्री ह्या एकादशींनाही पंढरपूरला आवर्जून येणारे वारकरी आणि अन्य भाविक आहेत. पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळंखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागांत पंढरपूरचा निर्देश ' पंडरगे ' असा केलेला आढळतो. पंडरगे हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आहे. ह्या नावावरूनच पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांडरीपूर, पांडरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली आहेत.

             डॉ. रा. मी. ढेरे ह्यांच्या मते विठोबा हा मूलतः गोपजनांचा देव आहे. दक्षिणेत संचार करणाऱ्या अथवा अर्धस्थिर अशा स्थितीत जगणाऱ्या गवळी-धनगर गोल्ल-कुरुब ह्यांसारख्या गाई-गुरे-शेळ्या-मेंढ्या पाळणाऱ्या जमातींचा देव आहे. गोल्ल-कुरुब हे  आंध्र-कर्नाटकांतले आणि गवळी-धनगर हे मुख्यतः दक्षिण महाराष्ट्रातले होत. त्यांचा निर्देश आंध्र-कर्नाटकांत ‘यादव’ म्हणूनही केला जातो. पंढरपूरच्या विठ्ठलाचा महिमा ज्यांनी वाढविला, ती अनेक राजकुले यादवच आहेत (उदा., देवगिरीचे तीन ‘यादव’ राजे-कृष्ण, महादेव आणि रामचंद्र; स्वतःला अभिमानाने यादव म्हणवून घेणारा, होयसळ वंशातला, वीर सोमेश्वर हा राजा इ.) हे डॉ. ढेरे ह्यांनी दाखवून दिले आहे. तमिळ भाषेत मेंढराला ‘याडु’ म्हणतात. ह्या शब्दापासून ‘यादव’ शब्द बनला; ‘यादव’ हे ‘याडव’ चे संस्कृतीकरण असावे. सेऊण यादवांचा आदिपुरुष तर गाईंचे रक्षण करणारा शूर वीर होता, हेही डॉ. ढेरे दाखवून देतात. धुळे, औरंगाबाद, नगर येथे मोठ्या प्रमाणावर वस्ती करून राहिलेले गोपाळ ह्या जमातीचे लोक पंढरपूरजवळील गोपाळपुऱ्यात राहत असत, असे एका पारंपरिक कथेत म्हटले आहे. ह्या गोपाळपुऱ्यास पंढरपूरच्या वारीत मोठे महत्त्व आहे आणि रुसलेल्या रक्मिणीची समजूत काढण्यासाठी कृष्ण प्रथम गोपाळपुऱ्यासच गोपवेषाने आला. अशीही कथा आहे.

                  डॉ. ढेरे ह्यांच्या मते, विठ्ठल-बीरप्पा ह्या धनगर-गवळ्यांसारख्या गोपजनांच्या जोडदेवांपैकी एक असलेला विठ्ठल हा पंढरपुरच्या विठ्ठलाचे आदिरूप होय. धनगरी विठ्ठल हा नेहमी बीराप्पासमवेत असतो; एकट्या बीराप्पाची स्वतंत्र ठाणी आढळतात; पण एकट्या विठ्ठलाची तशी आढळत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यांतील हातकणंगले तालुक्यात असलेले पट्टणकोडोली, सोलापूर जिल्ह्यातील पोखरापूर आणि सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे विठ्ठल-बीरप्पाची ठाणी आहेत; पट्टणकोडोली येथे दर वर्षी भोबी पौर्णिमेनंतर ( आश्विन पौर्णिमेनंतर ) मृग नक्षत्रावर तीन दिवस विराट यात्रा भरत असते. पट्टणकोडली येथे वारी-दिंड्याही येतात.

मराठी विश्वकोश खंड १६

धूळदेव कोळेकर